विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

Foto
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा जोरात सुरू असून विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यापूर्वी देखील विलिनीकरणाची चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. विलिनीकरणाबाबत अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात माझ्याच उपस्थितीत चर्चा झाली होती, अजित पवार चांगलं नेतृत्व करत आहेत, तुम्ही एकत्र आलं पाहिजे असे मी त्यांना म्हणालो होतो. त्यावेळी, 40 ते 45 मिनिटे चर्चा झाली होती, असा मोठा दावा देखील भुजबळ यांनी केलाय.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरुन सध्या राजकीय वादळ उठलं आहे, विशेष म्हणजे पक्षातील वरिष्ठ नेतेही याबद्दल प्रतिक्रिया देताना दिसून येतात. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली. योग्य वेळी योग्य निर्णय होईल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर, आता मंत्री छगन भुजबळ यांनीही मोठा दावा केला आहे.

माझं ऑपरेशन झालं होतं, मी आजारी असताना मला भेटण्यासाठी जयंत पाटील आले, त्यानंतर 5 मिनिटांतच जयंत पाटीलही आले होते, त्यावेळी आपण सगळ्यांनी एकत्र यावे असे मी जयंत पाटलांना म्हटलं. जवळपास 40 ते 45 मिनिटे चर्चा झाली. पण, जयंत पाटील बोलले तुम्ही सत्तेत एनडीएसोबत आहात, तुमच्या सह्योगी पक्षाला चालणार का? तेव्हा मी म्हटलो पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आहेत ते बघतील. संस्थापक अध्यक्ष शरद पवार आहेत, चर्चा होईल. पण पुढे काही झाले नाही, अजित पवार नाहीत पण जयंत पाटील आहेत, असेही भुजबळ यांनी म्हटले.

एकत्रितरित्या चर्चा झाली पाहिजे
विलिनीकरणाबाबचं हे खरं आहे, मीडियावाले दाखवत आहेत, सध्या मर्जर-मर्जर खेळ सुरू आहे. दोन्ही बाजूने सांघिक खेळ झाला पाहिजे, आमच्यातला एखादा जातो आणि चर्चा करतो. क्रिकेट सुरू आहे, सगळ्यांची एकत्रितरित्या चर्चा झाली पाहिजे, तुटक तुटक चर्चा नको. आम्ही फक्त टिव्हीत पाहतो, मग त्यातून श्लेष काढतात तो आम्ही ऐकतो, असे म्हणत छगन भुजबळ यांनी विलिनीकरणाच्या सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. 

सुनेत्राताई आम्हाला विश्वासात घेऊन ठरवतील
पवार साहेबांना भेटायला मी पण गेलो होतो, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला जाणे चूक नाही. माझ्या आयुष्यात दोन नेते, बाळासाहेब ठाकरे ते आता नाहीत, दुसरे शरद पवार ते आता दुसऱ्या पक्षात आहेत. इतर मात्र सगळे सहकारी पक्षीय नेते आहेत. सगळे एनडीए  मध्ये येणार की इंडिया आघाडीमध्ये जाणार याचा शोध बोध झालेला नाही. सुनेत्रा ताईने सांगितलंय योग्य वेळ येईल, योग्यवेळी सांगतील, असे म्हणत विलिनीकरणाच्या मुद्द्यावर भुजबळ यांनी योग्यवेळी योग्य निर्णय होईल, असे सांगितले. सुनेत्राताई आम्हाला विश्वासात घेऊन ठरवतील, असेही भुजबळ यांनी म्हटले. 

मला आयुष्यात मला दोन मार्गदर्शक भेटले, बाळासाहेब आणि पवार साहेब. पवार साहेबांशी आमचे संबंध आहेत, राजकारणात दुश्मनी  असली  तरी ते संबंध ठेवतात. दिवाळी असली की शुभेच्छा देतो, पवार साहेब राज्यातील जेष्ठ आणि सगळ्यात मॅच्युर्ड नेते आहेत. जर कुणी एकत्र आले तर आनंद आहे. ठाकरे एकत्र आले सगळ्यांना आनंद झाला. राष्ट्रवादी मोठी करण्यात पवार आणि छगन भुजबळ होता, बाकीचे लोक नंतर आले, काहींनी मतदान घेतले. एकत्रीकरण झाले, जुने जाणते एकत्र आले तर आनंदच होईल, असे भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले.